वसई परिसरातील सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समाज हा जरी ख्रिश्चन असला, तरी भारतीय हिंदू परंपरा त्यांनी कशा जपल्या, हिंदू सण-उत्सव ते कसे साजरे करतात, येथील मातीशी आणि संस्कृतीशी त्यांची नाळ आजही कशी जोडलेली आहे, ते मूळ हिंदू कसे आहेत? हे सांगणारे पुस्तक….
लेखक : दीपक जेवणे
मूळ किंमत : रु. 300/-
सवलत मूल्य : रु. 270/-
भूमिका
साप्ताहिक विवेकचे माजी संपादक आणि हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेशजी पतंगे यांचा मला दूरभाष आला. एक वेगळ्या प्रकारचा पुस्तकाचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे त्यामुळे तू सानपाडा कार्यालयात येऊन मला भेट. असे बोलून त्यांनी मला वसईतील सामवेदी ख्रिस्ती समाजाबाबत ओझरती माहिती दिली. मूळचा हिंदू ब्राह्मण असलेला हा समाज पोर्तुगीज राजवटीच्या काळात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झाला. तसे इंग्रज राजवटीत आणि इंग्रजांच्या राजवटीपूर्वी त्याचबरोबर सध्याच्या काळातही असे धर्मांतर सुरूच आहे. तथापि या सामवेदी समाजाचे आगळेवेगळे वैशिष्ट म्हणजे धर्मांतर होऊन ख्रिस्ती बनल्यानंतरही त्याने आपली जुनी सांस्कृतिक ओळख आजही टिकवून ठेवली आहे. आजही त्यांच्या सामाजिक व्यवहारात आणि आचरणात त्यांच्या मूळ परंपरांचे ठळक दर्शन घडते. येथील मातीशी आणि संस्कृतीशी त्यांची नाळ आजही जोडलेली आहे. ती नाळ कशी जोडलेली आहे आणि त्यांनी आपली मूळची ओळख कशी टिकवून ठेवली आहे. याचेच दर्शन घडविणारे पुस्तक मला लिहायचे होते.
तसे पाहता, मी अशाप्रकारचे लेखन यापूर्वी कधीच केले नव्हते. त्यामुळे पतंगे सरांच्या सांगण्यावरून का होईना! पण ते लेखन नेमके कसे करायचे आणि ते करता येईल का? याबद्दल मी साशंक होतो. भालीवली येथील राष्ट्रसेवा समितीच्या विवेक रुरल सेंटरच्या कार्यालयात या प्रकल्पाचे प्रमुख प्रदीपजी गुप्ता, सामवेदी समाजातील एक उद्योजक आणि प्रदीपजींचे मित्र नेल्सन रिबेलो यांच्यासोबत रमेशजी पतंगे आणि या पुस्तकाच्या प्राथमिक आराखड्याची चर्चा करण्यासाठी बसणार होतो. त्या बैठकीच्या आदल्या दिवशी मला पतंगेजींनी सानपाडा कार्यालयात बोलवले होते. तेथून त्यांच्या मुलुंड येथील घरी व त्यानंतर थेट भालीवली असा आमचा दीर्घ प्रवास होणार होता. हे नियोजन समजल्यावर मला खूपच आनंद झाला. कारण माझ्या मनात या पुस्तकांच्या संदर्भात अनेक प्रश्न आणि शंका होत्या. या सर्व शंकांचे निराकरण करण्यासाठी आमच्या या प्रवासाचा चांगलाच उपयोग होईल अशी माझी भावना होती आणि झालेही तसेच! पतंगे सर यांची आतापर्यंत इतकी पुस्तके प्रकाशित झाली आहेत की ते माझे या लेखन क्षेत्रातले गुरुच आहेत. एखाद्या पुस्तकाच्याबाबत मूलभूत चिंतन कशाप्रकारे करावे लागते, लेखन करतांना कोणकोणते पैलू लक्षात घेतले पाहिजे, विषयाचे वेगवेगळे कंगोरे कसे ध्यानात घेतले पाहिजेत याचा एक आदर्श वस्तुपाठच मला त्या दिवशीच्या चर्चेतून मिळाला. पतंगे सरांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनावरचा अनामिक ताणतणाव बर्यापैकी निवळला आणि दुसर्या दिवशीच्या बैठकीला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालो.
प्रदीपजी गुप्ता यांच्या हसतमुख आणि आदबशीर स्वभावामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात या गंभीर विषयाची बैठक पार पडली आणि हे पुस्तक करण्याचे ठरले. पण माझ्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची मला त्यादिवशी पूर्णांशाने कल्पना आली नव्हती. मला पतंगे सरांनी या पुस्तकाचे एक ढोबळ प्रारुप तयार करण्यास सांगितले आणि त्यानुसार नियोजन करून माझा वसईतील प्रवास होणार होता आणि तेथील काही निवडक मान्यवरांशी मुलाखती होणार होत्या. या मान्यवरात वसईतील उगवते लेखक सोबर्स रॉड्रिग्ज, या प्रकल्पासाठीचे गाईड या अर्थाने माझे मार्गदर्शक व्हिक्टर पेगॅडो तेथील सामाजिक कार्यकर्ते रॉबर्ट, समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती अँड्रयू लोपिस सर, दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे व आपल्या ग्रंथ लेखनामुळे वसईत सर्वपरिचित असलेले सुजाण पालकत्व या संकल्पनेवर अधिकारवाणीने भाष्य करणारे फ्रान्सिस डिमेलो, सामवेदी समाजाची संस्कृती आणि इतिहास यावर अधिकारवाणीने भाष्य करणारे वसईतील इतिहासपुरुष फादर फ्रान्सिस कोरिया अशी लांबलचक यादी होती.
झाले! माझा वसईतील बारा गावांचा प्रवास सुरू झाला आणि लवकरच ‘बारा गावचे पाणी प्यायलेला माणूस’ असे बिरुद माझ्या नावाच्या पाठीमागे चिकटते की काय असे मला वाटायला लागले. माझे कधी या गावात तर त्या गावात, कधी या चर्चमध्ये तर कधी त्या चर्चमध्ये असे प्रवास सुरू झाले. भेटणार्या प्रत्येक नवीन माणसाला माझ्या भेटीचा उद्देश सांगायचा, पुस्तक लेखनाबद्दल माहिती द्यायची, त्यांच्याकडून मला कोणती माहिती अपेक्षित आहे ते सांगायचे आणि त्यांच्यासोबत चर्चा करायची, असा उपक्रम सुरू झाला. बरे! प्रत्येक ठिकाणी या चर्चेचे आणि मुलाखतीचे ध्वनीमुद्रण करता येईल अशी परिस्थितीसुद्धा नव्हती. कारण त्यामुळे काय सांगावे आणि काय सांगू नये असा संभ्रम सांगणार्याच्या मनात निर्माण होत असे आणि ही चर्चा खूपच तांत्रिक आणि औपचारिक अशी होत असे. अशा चर्चेतून फारसे काही हाती लागेल असे मला वाटेना! त्यामुळे मग पुढच्या प्रवासापासून आवश्यक तेवढेच ध्वनीमुद्रण आणि बाकी मनमोकळ्या गप्पा! असा उपक्रम सुरू केला. पण अशा गप्पा मारताना अतिशय सजग राहून बोलणार्याचे मुद्दे आपल्या मनावर अंकित करून घेणे भाग होते. त्यालाही स्मरणशक्तीच्या मर्यादा होत्या. मुलाखती, चर्चा आणि गप्पा झाल्यानंतर पुण्याला परतायचे व आपल्या रोजनिशीत आवश्यक ते संदर्भ मुद्यांच्या स्वरूपात नोंदवून ठेवायचे आणि त्या कच्च्या नोंदींच्या
भरवशावर या पुस्तकाचे कार्यालयात बसून लेखन करायचे.
अशाप्रकारचे लेखन ही कंटाळवाणी आणि किचकट प्रक्रिया आहे, हे मला लवकरच उमगले. कारण लिहिलेल्या कच्च्या आराखड्यात मला वारंवार बदल करावासा वाटत असे. काल लिहिलेले लेखन मला दुसर्या दिवशी स्वत:लाच पसंत पडत नव्हते आणि मग पुन्हा नव्याने ते लिहायचे विचार मनात थैमान घालत. याला मुख्य कारण म्हणजे मला या सर्व मुलाखतीतून एकसलग असे काही हाती लागत नव्हते. हे सर्व वेगवेगळ्या माहितींचे तुकडे होते. त्यामुळे हा असा कोलाज वाचकांना कसा पसंत पडेल? याबद्दल माझ्याच मनात शंका उभी राहत होती. मग या सर्व माहितीच्या प्रस्तुतीकरणात रोचकता, रंजकता आणि त्याचबरोबर एकसूत्रता यावी असे मला पुन्हापुन्हा वाटू लागले आणि याच विचारप्रक्रियेतून जन्माला आले फादर निकोलस हे काल्पनिक व्यक्तीमत्त्व! हे व्यक्तीमत्त्व जरी काल्पनिक असले तरी मला वसईमध्ये भेटलेल्या आणि मी तेथे अनुभवलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा तो कोलाज आहे. फादर निकोलस अल्मेडा यांच्या तोंडी मी कोणत्याही प्रकारे माझी भाषा घातलेली नाही अथवा त्यांनी मांडलेले विचारसुद्धा माझ्या विचारांतून उद्भवलेले नाही. फादर निकोलस अल्मेडा हे अस्सल वसईच्या मातीतीलच व्यक्तीमत्त्व आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची मला आवडणारी रंगरंगोटी करणे मी विचारपूर्वक टाळले आहे. त्यामुळे फादर निकोलस अल्मेडा यांचे विचार व भूमिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. फादर निकोलस अल्मेडा यांनी मांडलेल्या सर्वच विचारांशी मी काही पूर्णपणे सहमत असेनच असे नाही. पण एक व्यक्ती म्हणून त्यांचे विचारस्वातंत्र्य जपत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत मी फादर निकोलस अल्मेडा यांचे विचार या पुस्तकात मांडले आहे. फादर निकोलस अल्मेडा यांनी मांडलेले विचार हे सर्वस्वी मला वसईत भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून, वेगवेगळ्या वेळी व्यक्त झालेले आहे. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात फादर निकोलस अल्मेडा या काल्पनिक व्यक्तीमत्त्वाच्या तोंडून ते सुसंगतपणे मांडण्याचे काम मी केले आहे. जर कोणाला फादर निकोलस अल्मेडा हे खरेखुरे व्यक्तीमत्त्व वाटले तर हे विचार आणि भूमिका सुसंगतपणे मांडण्यात मी यशस्वी झालो आहे असेच मला वाटेल.
या पुस्तकाचे लेखन प्रकरणांच्या क्रमानुसार झालेले नाही. जसा जो विषय मला सुचला आणि नुकत्याच झालेल्या मुलाखतीतून जो विषय मला गवसला त्या मुलाखतीनंतर पुण्याला परतल्यावर मी त्या विषयाचे लेखन केले आहे आणि मग नंतर ते प्रकरणांच्या विषयक्रमांनुसार मांडले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे लेखन कागदावर कमी आणि संगणकावर जास्त असे झाले आहे. या कामी मला माझ्या लक्ष्मी रोड येथील कार्यालयातील सहकारी सुरेश राठोड याचे बहुमोल सहकार्य झाले आहे. लिहिलेल्या मजकूरात अनेकवेळा बदल करणे, कोणताही क्रम न बाळगता मागच्यापुढच्या प्रकरणांचे मला सुचेल तशाप्रमाणे टंकलेखन करून देणे हे काम त्याने पार पाडले आहे. त्यामुळेच या पुस्तकाचे काम जलद गतीने झाले.
पण माझा कोणत्याही अर्थाने ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती परंपरा व धर्मतत्त्वज्ञान, ख्रिस्ती साहित्य, ख्रिस्ती उपासनापद्धत या सर्व गोष्टींशी पूर्वपरिचय नव्हता. वेगवेगळी माणसे आपल्या बोलण्यातू जी वेगवेगळी माहिती माझ्यासमोर ओतत होते त्याचा संदर्भ लागणे माझ्यासाठी खरोखरच अवघड झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी मी ख्रिस्ती धर्माशी संबंधित वेगवेगळी पुस्तके गोळा केली आणि त्यांचे वाचन केले. मला मिळालेल्या संदर्भांच्या पडताळणीकरता या पुस्तकांचा मला खूप उपयोग झाला. या पुस्तकांची संदर्भसूची या पुस्तकाच्या शेवटी मी दिलेली आहे. या पुस्तकात नमूद केलेली कोणतीही माहिती या संदर्भ ग्रंथाशी पडताळून पाहायची आणि नंतर त्याचा या पुस्तकात समावेश करायचा असा मी मनापासून प्रयत्न केला आहे. मात्र वाचकांना यात काही त्रुटी अथवा अभाव जाणवल्यास ती माझ्या अभ्यासातील कमतरता समजावी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून माझे भरणपोषण झालेले असल्यामुळे मी अशा संवेदनशील विषयावर निष्पक्षपणे लेखन करू शकेन असा मला विश्वास होता. त्या विश्वासाला माझे मार्गदर्शक रमेशजी पतंगे यांनी आश्वासक बळ दिले. बर्याचदा एखादा विषय या पुस्तकातून नेमका कसा मांडावा एवढेच नव्हे तर मांडावा की मांडू नये, याबाबतीतही माझ्या मनात संभ्रम निर्माण होत असे. मग अशावेळी दूरभाषवरून किंवा प्रत्यक्ष भेटीत मी त्यांच्याशी चर्चा करीत असे. तेव्हा माझे म्हणणे अगदी सहानुभूतीपूर्वक ऐकून, घेऊन माझ्या मनातील वैचारिक गोंधळ शमविण्याच्यादृष्टीने त्यांचे अगदी उचित आणि सर्मपक मार्गदर्शन मला प्राप्त होत असे. घनदाट अंधारात हातातील विजेरीच्या सहायाने माणसाला जशी लख्ख पायवाट दिसते त्याप्रमाणे मला आपोआप मार्ग गवसत असे आणि पुढचे लेखन करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळत असे. असे म्हणतात की, महर्षी वेदव्यास यांनी महाभारत सांगितले आणि त्यांचा लेखनिक म्हणून समोर बसलेल्या श्री गणेशाने ते लिहून काढले. त्या श्रीगणेशाएवढी माझी पात्रता नसली तरी माझ्या लेखनाचा श्रीगणेशा साप्ताहिक विवेकमध्ये पतंगे सरांच्या मार्गदर्शनाखालीच मी गिरवला असल्याने त्याचबरोबर त्यांचा लेखनिक म्हणून दीर्घकाळ काम केलेले असल्यामुळे मला या पुस्तक लेखनाचे वैचारिक धाडस करावेसे वाटले. लेखनिकातून लेखक घडविणे हे पतंगे सरांचे माझ्यावरील उपकारच समजले पाहिजेत. यातून मी या जन्मात तरी उतराई होऊ शकणार नाही! अशा प्रकारचे एखादे पुस्तक लिहिण्याची माझी आंतरिक इच्छा असली तरी मी असे पुस्तक लिहिन असे मला कधीच वाटले नव्हते. पतंगे सरांनी मला तशी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारे सर्वप्रकारचे मार्गदर्शन दिल्यामुळेच हे पुस्तक सिद्ध झाले आहे.
आता थोडे या पुस्तकातील वर्ण्यविषय संदर्भात सांगणे आवश्यक आहे. वाचकांनी या पुस्तकाचे वाचन करताना त्याला असलेला स्थलकाळाचा संदर्भ अवश्य लक्षात घेतला पाहिजे. मला जो सामवेदी ख्रिस्ती समाज या वसईत भेटला त्याची खरोखरच काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत आणि तो त्याप्रकारचा एक आगळावेगळा समाज आहे. त्याचा परिचय या पुस्तकातून आपल्याला होणार आहेच. परंतु वसई परिसरातील ख्रिश्चनांप्रमाणेच सर्व भारतभरातील ख्रिश्चन समाज अगदी तसाच आहे किंवा असतो अशी समजूत वाचकांनी कृपया करून घेऊ नये. या सामवेदी ख्रिस्ती समाजाबाबत मला जाणवलेली गोष्ट थोडक्यात अशी की, या लोकांनी आपला धर्म बदलला पण आपली संस्कृती बदलली नाही, आपल्या मूळ प्राचीन भारतीय मूल्यांशी आणि आपल्या पूर्वजांशी फारकत घेतली नाही आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड या समाजात नाही. या समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, यांनी ख्रिश्चन धर्माचे आणि त्यातील उपासनापद्धतीचे एका अर्थाने भारतीयीकरण करून टाकले आहे. त्यामुळे देशबाह्य निष्ठेचा कोणालाही येथे बिलकूल आरोप करता येत नाही. भारतीय तत्त्वज्ञानाने उपासनामार्गाचे स्वातंत्र्य आधीपासूनच सर्वांना दिलेले आहे. या भारतभूमीतील वेगवेगळे संप्रदाय त्यांच्या-त्यांच्या मार्गाने परमेश्वराची उपासना आधीपासूनच करीत आहेत. त्यामुळे एखाद्याची उपासनापद्धती काही कारणाने बदलली तरी तो आपल्या प्राचीन भारतीय मूल्य परंपरेला, संस्कृतीला आणि आपल्या पूर्वजांना पारखा होऊ शकत नाही. हेच सत्य आपल्याला या सामवेदी ख्रिस्ती समाजाकडे पाहून उमगते. खरे म्हणजे या बारा गावात पसरलेला हा सामवेदी ख्रिस्ती समाज संपूर्ण देशभरातील ख्रिश्चन समुदायासाठी एक अनुकरणीय आदर्श होऊ शकतो. अशाप्रकारे परस्पर सामंजस्य आणि सहअस्तित्वाच्या भूमिकेतून सर्वांचा आचारविचार आणि व्यवहार घडायला लागला तर मग वर्तमान संदर्भात आपल्यासमोर धार्मिक वाद आणि संघर्षाचे जे प्रश्न उभे राहतात ते उभे राहणार नाहीत आणि यदाकदाचित उभे झालेच तर त्यांची तीव्रता तितकी दाहक असणार नाही. कारण चर्चेच्या माध्यमातूनच त्यांचे निराकरण होऊ शकेल. मला वाटते की या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका एक लेखक म्हणून मी या ठिकाणी पुरेशी स्पष्ट केली आहे.
– दीपक हनुमंत जेवणे
Reviews
There are no reviews yet.